Shiv Jayanti 2021: शिवजयंती उत्साहात साजरी होणार; 'ही' काळजी मात्र घ्यावी लागणार
Ajit Pawar: करोनाच्या सावटाखालीच यंदाची शिवजयंती साजरी होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आज आढावा बैठक घेऊन याबाबत काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
पुणे: राज्यावरील करोना संसर्गाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीत सण-उत्सव सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरे करावे लागतील, असे नमूद करतानाच यंदाचा शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करत असताना सुरक्षिततेचीही संपूर्ण काळजी घेण्यात यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले. ( Ajit Pawar on Shiv Jayanti 2021 )
व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे शिवजयंती उत्सव आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गेल्यावर्षी मार्चपासून करोनाचे संकट आले. त्यामुळे या काळात आलेले सर्व धर्मांचे सण, उत्सव साधेपणाने साजरे केले गेले. यंदा १९ फेब्रुवारी रोजी असणारी शिवजयंती आपण उत्साहात, सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरी करू. शासनाच्या आवाहनाला जनतेने नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, याही वेळेस तसा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी गडावर राज्याचे प्रमुख अभिवादनासाठी येण्याची परंपरा आहे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दिवशी अभिवादनासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवनेरी गडावर करण्यात येणारी विकासकामे दर्जेदार होतील, अशी दक्षता घेण्याच्या सूचना अजित पवार यांनी यावेळी केल्या. जेथे पुरातत्व विभाग, वन विभागाच्या परवानग्या घेणे आवश्यक आहे तेथे परवानग्या घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Social Plugin